पुणे : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरच्या लँडिंगबाबत पुरंदरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त खानवडी येथे आयोजित कार्यक्रमाला जात असताना, पायलटने हेलिकॉप्टर अधिकृत हेलिपॅडवर न उतरवता चक्क गाड्यांच्या पार्किंगमध्ये उतरवले. या प्रकारामुळे उपस्थित पोलीस आणि प्रशासकीय अधिकार्यांची मोठी धावपळ उडाली.
क्रांतीज्योती महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी छगन भुजबळ हेलिकॉप्टरने येणार होते. प्रशासनाने खानवडी गावात त्यांच्या लँडिंगसाठी सुरक्षित ठिकाणी हेलिपॅड तयार केले होते. मात्र, हेलिकॉप्टर खानवडीच्या आकाशात पोहोचल्यानंतर पायलटने खाली पाहिले असता, त्याला कार पार्किंगची मोकळी जागा दिसली. पायलटने त्या जागेलाच हेलिपॅड समजले आणि थेट पार्किंगमध्ये हेलिकॉप्टर उतरवण्यास सुरुवात केली. कार पार्किंगमध्ये हेलिकॉप्टर उतरल्याचे पाहताच तिथे तैनात असलेल्या पोलिसांचे धाबे दणाणले.
पोलिसांची धावपळ आणि सुधारणा
गाड्यांच्या पार्किंगमध्ये हेलिकॉप्टर उतरताच पोलिसांनी तात्काळ पायलटशी संपर्क साधला. ही जागा अधिकृत हेलिपॅड नसल्याने पायलटची मोठी चूक झाली. पोलिसांनी चूक निदर्शनास आणून दिल्यानंतर, पुन्हा इंजिन सुरू करून हेलिकॉप्टर तिथून हलवण्यात आले आणि त्यानंतर नियोजित हेलिपॅडवर ते सुरक्षितपणे उतरवण्यात आले. सुदैवाने, या सर्व प्रकारात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही, परंतु काही काळ तिथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.